आई माझ्या भोवती
कायम तुझा आभास
आजही माझ्या श्वासात
तुझ्या मिठीचा ग वास...
भिजल्या माझ्या मनाला
तुझ्या पदराची आस
कुशीत घेवून थोपटशील
अजून होतो भास !
कानी माझ्या घुमतो
तुझ्या बांगड्यांचा नाद
अंगाईच्या गाण्यात
तुझ्या मायेचा गं साज ...
अजून शोधतो रोज
तुझ्या कुशीचा मी ठाव
प्रेमाच्या त्या नजरेत
तुझ्या रागाचा तो आव !
संध्याकाळी कातरवेळी
एकटीच माझी सावली
अंगणतली वेलही पुसते
कुठे रे ती माउली !
देवघरातला दिवा विचारतो
कशी रे विजली वात…
कोमेजलेली तुळस घालते
केविलवाणी साद !
दारच्या उंबरठ्याला
त्याच्या लक्ष्मीची आस…
घरची हर एक भिंत सांगते
“इथेच तिचा वास”...
कणखर होता बाबा माझा
व्याकूळ झाला बघ किती
अबोल झुरतो ,अजून शोधतो
कुठे हरवली त्याची सखी !
मधेच हाक देशील कधी
आतूर बघतोय वाट…
ये ग आई, पूस ग माझ्या
आसवांची लाट
आसवांची लाट