Thursday, 1 December 2016

कैक वर्ष माळ्यावर एक ट्रंक होती आजीची
जड ,भक्कम ,धुळीनं माखलेली -
काळाचे व्रण सोसलेली अन
असंख्य आठवणी पोटात साठवलेली

ट्रंक उघडताच दिसला छोट्या आजीचा छोटासा बंब -
त्या बरोबर इवलीशी परात आणि साऱ्या खेळ भांड्यांचा संच .
बाजूलाच होता सुबक अक्षरातला तिचा इंग्रजी कवितांचा संग्रह -
‘दाखवण्याच्या' वेळी, "त्यातलीच म्हण एखादी "- असा झाला असेल का आग्रह?

त्याच पानांमध्ये सापडली
एका गुलाबाची वाळलेली कळी
अल्ह्ड वयातल्या तिच्या पहिल्या पहिल्या प्रेमाची
असावी का ही नाजूक निशाणी ?

आजीचा संसारच जणू ह्या पेटीत सामावलेला
लग्नातलं ताट, बारश्याची वाटी,मुंजीतला पेला ...
एका पिशवीत अलगद गुंडाळून ठेवलेला तिचा मखमली शेला
सोबतीला मुंडावळ्या आणि हिरव्या गार चुड्यातल्या तीन बांगड्या !

कशी दिसली असेल माझी आजी नवरी म्हणून?
आबांनी चोरून बघितल्यावर लाल बूंद झाली असेल का लाजून लाजून !
भरल्या डोळ्यानं कशी निघाली असेल कोकणातलं माहेर सोडून
मग नव्या शहरात, नवलाईच्या दिवसात गेली असेल का बहरून - मन मोहरून ?

एक दुपटंही दिसलं पिशवीच्या खाली ठेवलेलं -
दुधा तेलात झिरपलेलं - इतक्या वर्षांनीही बाळाचा वास देणारं
कशी चाहूल लागली असेल आजीला एका नव्या जीवाची ...
गरोदर,टेकलेली - गोड दिसली असेल ना माझ्या आईची माऊली

तिने घेतलेल्या पहिल्या ट्रान्सिस्टरची रसिदही सापडली त्या वहीत
शेवटपर्यंत तिच्या बरोबर होता तो - त्या माडीवरच्या खिडकीत
सर्वात मागे दडून ठेवलेली पत्रही होती खूप सारी
महत्वाच्या टप्प्यांची , तिच्या सुखं -दुःखाची बोलकी झलक देवून जाणारी

पार तळाशी नीट घडी घालून ठेवलेला होता आबांचा काळा कोट
अंधुकशी आठवते मला ती -
त्याला कवटाळून प्रयत्न करायची आवरण्याचा
आपल्या अश्रूंचा अविरत लोट.

किती ऋतू ,किती वर्ष,किती पर्व दडलेली होती ह्या पेटीत
शांतपणे बसलेली- एका अस्तित्वाचं सार बंद करून आपल्या मुठीत
मला ठाऊक असलेल्या आजीपेक्षा , आज तिची किती रुपं बघितली मी
कधी चंचल,कधी खंबीर - आणि कोणे एके काळी तर अजाणतीही होती ती !

का ग साठवून गेलीस ह्या असंख्य आठवणी
का स्वतःला ठेवून गेलीस अशी थोडीशी माघारी
कारण होती न तुला अगदी नक्की खात्री - एक दिवशी मी ही ट्रंक खाली उतरवीन
तिची धूळ साफ करीन आणि भरल्या गळ्यानं पण हसऱ्या मनानं
मोठ्या दिमाखिनं आजी - तुला घरी घेऊन येईन .