Monday, 4 February 2019

Raanphool

सांग जरा रे रानफूला
सांग मला रे रानफूला

रिंगण घालून असतो काटा
समोर दगडी निर्जन वाटा
कुणी ना बघते जाता येता
रूप तुझे रे असेच वाया...

ना चरणी देवाच्या चढतो
ना शृंगारी बहर फुलवतो
ना शब्दांमध्ये तू दडतो
ना अंती देहावर पडतो...

कसे हे जीवन व्यर्थ तुझे रे
ना झुरतो ना रुसतो तू !
हर्ष ना दुःख सवंगड्याचे
कसा असा जगतोस तू !

तुला न उष्मा तुला न थंडी
रेती-माती - समान प्रीति..
कसे तुझे हे राशी चक्र
ना जोरावर ना कुणी वक्र !

तरी बहरतोस, सजीव सजतोस
स्वतः मध्येच मदहोश तू !
कसा रे रमतोस, सदाच हसतोस
खुळा की शहाणा कोण तू ?

सांग जरा रे रानफूला
सांग मला रे रानफूला...

ये बस इकडे, ऐक निमिष- भर
सार तुझे तू समजून घे
गहन असे तर काहीच नाही
बैराग्याचे जीवन हे !

नको प्रशंसा, घृणा नको ती
दुसऱ्यावर ना निरभर मी
माझे जगणे, माझे हसणे
प्रेमात निरंतर माझ्या मी...

परक्याने का मोल करावे
त्यावर माझे भाव ठरावे!
मंजूर कधी हे केले नाही
म्हणून कधी मी रडलो नाही

जीवन माझे जगून बघ तू
विलीन ' त्याच्यात' होवून बघ तू
तो परमेश्वर, बाकी नश्वर - मग
खुळा की शहाणा , कुठे ग अंतर !

On a past memory...

तुला मी आवडायची,
मला माहिती नव्हतं असं नाही
माझ्या आवडी- निवडी जपायचास,
मी टिपलं नव्हतं असं नाही
अर्ध्या कच्च्या दिवसांमध्ये
सच्च्या-झूठ्या स्व्प्नांनामध्ये
तू होतास अवती- भवती
मला जाणवलं नव्हतं असं नाही ...

कुठे असतोस आजकाल
कसा दिसतोस ?
मनातल्या कुठल्याश्या कोपऱ्यात
मला मधूनच, अजून शोधतोस?
इतक्या वर्षांनी तू का आठवलास -
खरं अस काहीच घडलं नाहीए ...
पण सहज मागे वळून बघता , तूच दिसलास-
का? उत्तर मला सुद्धा सापडत नाहीए ....

प्रेमाचे, नात्यांचे अनेक पैलू पाहिले रे
काही रंग मळले तर काही सौदेच ठरले
काही सूर गवसले, काही हरवून गेले
काही मोती ओवले, काही टपाटप पडून गेले...
तृप्तीत नाहले , कधी होरपळले, बावरले, कधी हिरमुसले,
मनापासून हसले, स्वच्छंद रडले...
मग ओंजळ भरली असली, तरी
आज तुझ्या आठवणीत का रमले?

आपण कोणाला तरी आवडतो
हा अहंकार सुखावह असतो, म्हणून
का प्रेमाच्या बदल्यात
तुझ्या काहीच अपेक्षा नव्हत्या म्हणून?
निस्वार्थ, निर्मोह, निरागस संवेदनेची
तू व्याख्याच ठरलास म्हणून,
का आता कुठे जावून
आयुष्य समजतय, म्हणून?

काही असो , जस असो
सांगीन तुला जर कधी चुकून भेटलो ...
बरं झालं बोलला नाहीस - जाणवलं ते सारं
उगाच, शब्दांमध्ये बांधलं नाहीस.
म्हणून प्रेम बघ तुझं, स्वच्छच राहिलं ...
नात्यांच्या दलदलीत , कमळासारखं,
इतक्या वर्षांनी का होईना,
माझ्या मनामध्ये रूजून आज, सुंदरस उमललं !