तू तर शांत निजलेली दिस्तेयेस…
अग्नी देवून तुला कसं ग फसवू?
तुझी कांती सुरकुतलेली असली तरी माझ्या ओळखीची आहे...
जिच्या स्पर्शानं मी सुखावतो - ही माझ्या जननीची आहे...
देह आणि प्राण कसे विलग करू....
ह्या दोघांतही मी वसलेलो आहे - फरक कसा करू ??
हे सगळं काय घडतंय - मला काहीच समजत नाही...
पण अशी मधेच सोडून जाशील - हे तर ठरलं नव्हतं आई !
तुझी स्वप्नं पूर्ण करण्यात मी कुठे कमी पडलो का...
मी काय केल्यान परत येशील -एकदा सांगून तर बघ ना...
हट्ट करण्याच्या वयातून मी मोठा झालो असीन
पण तुझ्यासाठी तर नेहमी तुझ 'बाळच' राहीन...
मग आज माझी तडफड तुला कशी कळत नाहीये...
येवून मला कुशीत घ्यावं तुला का वाटत नाहीये ??
पोरकेपणाची जाणीव बघ किती लाचार करू शकते
तुझ्या मोक्षा पेक्षा जास्त आपल्या बंधनाला महत्व देते
स्वार्थ कि प्रेम कि असहायता - कुठल नाव देऊ...
भाव कुठलाही असला तरी आई तू निरोप नको घेवू !
हो मला कळतंय मी तुला जाऊ द्यायला हवं
तुझ्या यातनेतून हीच मुक्ती आहे मला समजायला हवं
तुझ्या वेदना कमी करू शकलो नाही - ही सल खूप बोच्तेय...
कदाचित ह्याच अपराधाची मला ही सजा मिळतेय...
मला सांत्वन नकोय - कारण मला समजायचं नाहीये...
तुझं जाण सत्य आहे, मला मान्यच करायचं नाहीये...
उद्या "विधाताच नाही " म्हंटल तर कुणाला पटेल का...
मग मी तुझं मिटण स्वीकारावं हा हट्ट का ?
आई,एकदा परत डोक्यावरून हात फिरव ना....
जी नजर फक्त तुझीच असू शकते,त्या मायेनी बघ ना....
रडतोय, म्हणून तरी नेहमीसारखी पोटाशी घे ना...
अशा वेळी बोलायचीस त्या शांत स्वरात पुन्हा बोल ना....
.........
ही हलकेच झुळूक येवून गेली, ती तुझी फुंकर का आई...?
मी उभा आहे ज्या सावलीत ती तुझ्या पंखाची तर नाही ?
अंगावर जो शहारा आला तो तुझ्या स्पर्शानी फुलला का ?
तप्त मन शांत झालं ते तुझ्या शीतल समजुतीनं का ?
धन्य आहेस तू ! बघ आजही माझ्या हाकेला कशी लगेच धावून आलीस…
"कितीही लांब गेले तरी भवतीच असीन" हा संकेत देवून गेलीस...
बरं तर मग - धर्म म्हणून,कर्म म्हणून, तुझ्या देहाला अग्नी देईन मी...
मात्र जन्मभर मनातल्या तुझ्या रूपाला फुलासारख जपीन मी !
No comments:
Post a Comment