काळ किती वेगानं पुढे सरकलाय
माझा नकटासा बाहुला आज बोहल्यावर चढलाय..
तुम्हा दोघांना एकत्र बघून मी खूप वर्ष मागे जातेय..
मी जिथे उभी होते,सूनबाई,त्या जागी आज तुला बघतेय...
हिरव्या साडीतली,पिवळ्या हळदितली,थोडीशी हरवलेली,खूपशी बावरलेली...
तुझ्या मनातली उलथापालथ कळतेय मला,आपली पिढी जरी बदललेली !
एका नवीन घराला, नवीन मित्राला आपलं सर्वस्व मानायचं आहे..
सासर-माहेरात्ल अनोळखी अंतर सात पावलांनी ओलांडायचं आहे..
इतकं सहज नसतं हे, ह्या उंबरठ्यावर मी उभी राहिलेली आहे...
मागचं न तोडून, नवीन सारं जोडून ह्या चतुर वाटेवर चाललेली आहे….
मात्र इतकं कठीणही नाहीए हे, अशी भांबावून जावू नकोस...
सारी नाती मनापासून स्वीकार,कुठलाही अडसर ठेवू नकोस.
पहिले काही दिवस तर तुम्हा दोघांचेच आहेत
राजा-राणीच्या सुंदर स्वप्नातले आहेत...
एकमेकांना ओळ्खा,एकमेकांना जाणा,आपली मन एकत्र गुंफा
तुमच्या नाजूक नात्याचा पाया,अचल विश्वासावर पक्का धरा
मी ज्याला घडवलं,जीवापाड जपलं,आज तो पूर्णपणे तुझा झालाय
माझं आकारण इथवरच होतं,आता तुझ्या हाती सोपवलाय...
आजवर मला फार अभिमान होता - "मी माझ्या मुलाला पूर्णपणे ओळखते"
मात्र नवरा म्हणून कसा ठरेल विचारशील,तर ह्या प्रश्नावर अडखळते !
माझ्या कडून भावना ओळखायला ,त्यांना मान द्यायला शिकवलं आहे मी त्याला
नाती हळुवारपणे जोपासायची असतात,समजावलं आहे मी त्याला...
पण ह्या शिकवणीची अग्निपरीक्षा तू देणार आहेस..
तुझ्या संसारातला सखा तुझा तूच शोधणार आहेस..
तुझ्या माझ्या नात्याचीही अनेक रूपं आहेत..
कुठल्या आरश्यात बघावं हे आपल्या हाती आहे...
'आई' म्हणून चल तुला आज काही गोष्टी सांगते..
माझी अनुभवाची गाठोडी,तुझ्यासमोर सोडते...
'मैथिलीतून' 'सीता' होणं तू स्वीकारलं आहेस...
अनोळखिश्या मुला मध्ये 'राम' शोधणार आहेस...
बेफिकीर,मदहोश कोशातून,नवीन जगात शिरणार आहेस...
प्रेम,कर्तव्य,सामंजस्य,नवीन अर्थ शिकणार आहेस...
हे बदल मोठे आहेत - पण नकळत घडूनही जातात..
जे आज आपलं सासर असतं,पुढे मुलं त्याला माहेर म्हणतात !
ही पर्व किती सहज पालटतील, हे आपल्या वरती असतं
आपण जे आज पेरू - पुढे तेच भविष्य ठरत....
म्हणूनच सुखाने,समाधानाने,स्वाभिमानाने ह्या वाटेवर चाल
तुझी अनेक रूपं बदलतील,सगळ्यांना प्रेमाच साकड घाल
हा खेळ जोडण्याचा आहे- पण चुकूनही मोडू नकोस कधी तुझ्या स्त्रीत्वाचा ताठा
त्यातून गरज भासलीच कधी तर आधार आहेच माझा...
ये बाळ,समृद्धीचं माप ओलांडून ,घरची लक्ष्मी बन आता
देवाकडे मागते,तुझ्या ओटीत मी घालते,अखंड आनंदाचा ठेवा.
आणि पूर्वीच तुला सांगितलय ते स्मरून देते पुन्हा...
आपण दोघी आधी मैत्रिणी - मग ह्या घरच्या सुना...!