Tuesday, 1 January 2013

Creative License and copyright information

Creative Commons License
Poems on Reshmawrites by Reshma is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License.
Based on a work at reshmawrites.blogspot.com.

For all mothers and daughters-in law

काळ किती वेगानं पुढे सरकलाय
माझा नकटासा बाहुला आज बोहल्यावर चढलाय..
तुम्हा दोघांना एकत्र बघून मी खूप वर्ष मागे जातेय..
मी जिथे उभी होते,सूनबाई,त्या जागी आज तुला बघतेय...

हिरव्या साडीतली,पिवळ्या हळदितली,थोडीशी हरवलेली,खूपशी बावरलेली...
तुझ्या मनातली उलथापालथ कळतेय मला,आपली पिढी जरी बदललेली !
एका नवीन घराला, नवीन मित्राला आपलं सर्वस्व मानायचं आहे..
सासर-माहेरात्ल अनोळखी अंतर सात पावलांनी ओलांडायचं आहे..

इतकं सहज नसतं हे, ह्या उंबरठ्यावर मी उभी राहिलेली आहे...
मागचं न तोडून, नवीन सारं जोडून ह्या चतुर वाटेवर चाललेली आहे….
मात्र इतकं कठीणही नाहीए हे, अशी भांबावून जावू नकोस...
सारी नाती मनापासून स्वीकार,कुठलाही अडसर ठेवू नकोस.

पहिले काही दिवस तर तुम्हा दोघांचेच आहेत
राजा-राणीच्या सुंदर स्वप्नातले आहेत...
एकमेकांना ओळ्खा,एकमेकांना जाणा,आपली मन एकत्र गुंफा
तुमच्या नाजूक नात्याचा पाया,अचल विश्वासावर पक्का धरा

मी ज्याला घडवलं,जीवापाड जपलं,आज तो पूर्णपणे तुझा झालाय
माझं आकारण इथवरच होतं,आता तुझ्या हाती सोपवलाय...
आजवर मला फार अभिमान होता - "मी माझ्या मुलाला पूर्णपणे ओळखते"
मात्र नवरा म्हणून कसा ठरेल विचारशील,तर ह्या प्रश्नावर अडखळते !

माझ्या कडून भावना ओळखायला ,त्यांना मान द्यायला शिकवलं आहे मी त्याला
नाती हळुवारपणे जोपासायची असतात,समजावलं आहे मी त्याला...
पण ह्या शिकवणीची अग्निपरीक्षा तू देणार आहेस..
तुझ्या संसारातला सखा तुझा तूच शोधणार आहेस..

तुझ्या माझ्या नात्याचीही अनेक रूपं आहेत..
कुठल्या आरश्यात बघावं हे आपल्या हाती आहे...
'आई' म्हणून चल तुला आज काही गोष्टी सांगते..
माझी अनुभवाची गाठोडी,तुझ्यासमोर सोडते...

'मैथिलीतून' 'सीता' होणं तू स्वीकारलं आहेस...
अनोळखिश्या मुला मध्ये 'राम' शोधणार आहेस...
बेफिकीर,मदहोश कोशातून,नवीन जगात शिरणार आहेस...
प्रेम,कर्तव्य,सामंजस्य,नवीन अर्थ शिकणार आहेस...

हे बदल मोठे आहेत - पण नकळत घडूनही जातात..
जे आज आपलं सासर असतं,पुढे मुलं त्याला माहेर म्हणतात !
ही पर्व किती सहज पालटतील, हे आपल्या वरती असतं
आपण जे आज पेरू - पुढे तेच भविष्य ठरत....

म्हणूनच सुखाने,समाधानाने,स्वाभिमानाने ह्या वाटेवर चाल
तुझी अनेक रूपं बदलतील,सगळ्यांना प्रेमाच साकड घाल
हा खेळ जोडण्याचा आहे- पण चुकूनही मोडू नकोस कधी तुझ्या स्त्रीत्वाचा ताठा
त्यातून गरज भासलीच कधी तर आधार आहेच माझा...

ये बाळ,समृद्धीचं माप ओलांडून ,घरची लक्ष्मी बन आता
देवाकडे मागते,तुझ्या ओटीत मी घालते,अखंड आनंदाचा ठेवा.
आणि पूर्वीच तुला सांगितलय ते स्मरून देते पुन्हा...
आपण दोघी आधी मैत्रिणी - मग ह्या घरच्या सुना...!

for my brave friends....and their unparalled love

मीच माझी हैराण होते,प्रत्येक श्वासापरी स्तब्ध होते
हे कसं शक्य आहे – न जाणे स्वतःलाच कितीदा विचारते...
मी जिवंत आहे ? तुझ्या नंतरही आयुष्य जगते आहे ?!
चालते आहे,बोलते आहे, कधी कधी तर हस्तेही आहे!

"तू नाहीएस” मला कळलं नाहीये का ?
तुझं अचानक जाण फक्त एक भयंकर स्वप्नं आहे, मला असं वाटतंय का ?
कश्यावर विश्वास ठेवू ? तुझ्या जाण्यावर कि माझ्या जगण्यावर ?
अर्धवट डाव मोडण्यावर कि तरीही खेळ चालूच राहिल्यावर ?

कितीदातरी शून्यात हरवते...वाटतं काळ थांबला कि मागे फिरेल....
पुन्हा तू असशील , मी असीन,आपला संसार असेल...
तुला माझा संवाद कळेल किंवा बोलले नाही तरी प्रतिसाद मिळेल
मी आणि मुलं नेहमीसारखे तुझ्या मिठीत विरघळू ...आणि थोडावेळ काळही फसेल...

पण असं होत नाही रे....तुझा घट्ट धरून ठेवलेला हात नकळत निसटून जातो...
कितीही साद घातली तरी उलटून माझाच श्वास येतो...
बेभान होवून शोधलं तरी हाती भासच येतात
त्यांना जपून ठेवाव म्हंटल तर तेही नाहीसे होतात...

दिवस कसातरी निघून जातो......रात्र वैऱ्याची ठरते..
"पहिल्या रात्री" पासूनची प्रत्येक घटका आठवते..
आपल्या नात्याचा हर एक पैलू मी पुन्हा पुन्हा उलगडते...
मित्र,नवरा,मुलगा, बाबा,सगळ्यांना त्यात भेटते...

मुलांचे मूक प्रश्न,त्यांना काय उत्तर देवू ?
तू किती लांब गेला आहेस, मी कसं समजावून सांगू ?
तुझ्याशी त्यांचं नात आता फक्त आठवणीतल का रे ?
"आपला बाबा असा होता" आता फक्त गोष्टितल ना रे !

पण थांब…...माझ्या सारखा तुही असाह्य दिस्तोयेस...
माझा अबोल आक्रोश तुझ्या कंठातून निघतोय...
निघून तर गेला आहेस,पण 'जाता' येत नाहीये...
मी,मुलं, समोर दिसतोय, पण घरी येता येत नाहीये...!!

स्वतःच्या दुक्खात किती स्वार्थी झाले मी
ज्याचं सारं लुटलं,त्यालाच दोषी ठरवलं मी !
सारं सोडून, सारं गमावून एकाट वाटा तुझ्या आहेत..
आशेनं ज्यांच्या कडे बघाव, माझ्या कुशीत तर आपली मुलं आहेत....

खरच चुकलं माझं...तुला अडकवून ठेवलं मी..
माफ कर राजा तुला जकडून ठेवलं मी...
आज पहिल्यांदा तुला निरोप देते....साऱ्या बंधनातून मुक्त करते..
काळजी करू नकोस मी सगळं सांभाळीन - तुला आश्वासनही देते....

आपल्या दोघांची सारी स्वप्नं मी पूर्ण करीन
तुझं प्रत्येक अपुरं कर्तव्य मी पार पाडीन
तू दाखवलेली दिशा आपल्या मुलांचा मार्ग बनेल
तुझी आठवण अडथळा नाही आम्हा सगळ्यांचा आधार ठरेल

तुला सारं काही सांगीन ,पण प्रश्न विचारणार नाही...
रोज तुला स्वप्नात बघीन,पण सत्य विसरणार नाही...
अवघड वाटेवर डगमगणार नाही..आणि अडखळेच तरी पडणार नाही...
मनापासून सांगते - सख्यारे निवांत नीज....तुझ्या गाढ झोपेतून आता तुला उठवणार नाही.

a mother's farewell to her young children

मुलांनो, तुमच्यासाठी जन्माची शिदोरी बांधून ठेवतेय…
आज जमेल त्या शब्दात तुम्हाला 'आई' देवून जातेय..
आता कधीही माझी जायची वेळ येईल...
त्यावेळी कदाचित शब्द फुटणार नाहीत आणि मनातलं सारं मनातच राहील.

माझ्यावर रागावू नका हं - मी खरच खूप प्रयत्न केला
फक्त मनोबळाच्या जोरावर मृत्यूला झगडा दिला…
मात्र आता ह्या लढाईत मी थकत चालले आहे....
नाईलाजाने का होईना शस्त्र टाकत चालले आहे.

मला माहिती आहे - माझ्या जाण्याची चाहूल तुम्हाला कासावीस करतेय
माझ्यासमोर दर्शवल नाहीत तरी रोज उशी भिजव्तेय….
खूप लहानश्या वयात जगातल मोठसं सत्य पचवायचा आहे तुम्हाला
अशक्य वाटलं तरी लवकरच 'ओ' येणार नाहीये, तुमच्या "आई” ह्या हाकेला..

सुरुवातीला तुम्हाला माझी पदोपदी आठवण येईल
प्रत्येक छोट्या गोष्टीत, मी नाहीये,पुन्हा पुन्हा जाणीव होईल
कपडे सापडणार नाहीत, पुस्तकं मिळणार नाहीत,वस्तू दिसणार नाही..
एवढच काय तर, सकाळचं दुध कसं बनवायचं,हे सुद्धा सुचणार नाही !!

पण हळू हळू तुम्ही सारं काही शिकाल
आजवर जे सांगितलं ते तेव्हा जाऊन ऐकाल !
दप्तर जागेवर ठेवाल,हात-पाय धुवून स्वतःच वाढून घ्याल
आणि आई ओरडायच्या आधी पटकन अभ्यासालाही बसाल !

चला, आज आपण सारे मिळून आणखी एक गोष्ट ठरवूया...
फक्त सुंदरच आठवणी जोपासायच्या,हा निश्चय करून टाकूया.
एकमेकांच्या सहवासातल भरपूर प्रेम तेवढं आठवायचं
आई नाहीये पेक्षा ती काय सांगून गेली,तेच नेहमी स्मरायच

बाळांनो खूप मोठ्ठा व्हायचं - मानानं आणि मनानही बरं का !
स्वार्थ कधीच समाधान देत नाही,नेहमी लक्षात ठेवाल ना ?
कर्तुत्वाच्या जोरावर जगात खूप प्रसिद्धी मिळवा…
मात्र कशाच्याही आधी - “एक चांगला माणूस” - ही कीर्ती कमवा

आयुष्यात अनेक अनुभव येतील...
फसवणुकीचे,खोटेपणाचे कुरूप चेहेरे दिसतील
त्या सगळ्या मधून तुम्हाला सौख्याच निर्मळ रूप शोधायचंय
अपयशाचे काटे निवडून फक्त यश तेवढ स्वीकारायचंय

कुणाशीही मैत्री करताना मन अगदी मोकळं ठेवा
आणि एकदा 'आपलं' मानल्यावर,कायमचा साथ निभवा
नाजूक नात्यांच्या लडीत कधीच अहंकार पिरू नका...
गर्वाचा नेहमी नाशच होतो हा धडा कधीही विसरू नका...

मी शरीरान कदाचित दिसेनाशी होणार आहे....
पण डोळे बंद केलेत तर नेहमीच समोर असणारे
प्रत्येक वळणावर माझी शिदोरी तुमची तहान-भूक भागवेल…
आणि एके दिवशी आपल नातं अस्तित्वाच्या सार्या सीमा ओलांडेल

बघाच तुम्ही,दिवस कसे भुर्रकन उडून जातील...
बघता बघता माझी मुलं आपला स्वतःचा संसार मांडतील…
त्या तृप्त वेळी एका छवितून मी मंदशी हसीन….
माझ्या बहरलेल्या वेलीची द्रिष्ट काढून टाकीन !