Friday, 16 September 2011

शत जन्मिची मी तीच राधिका




धुंद निशिगंध अर्ध उमलला
वार्यात सुंगंध सुलगून दरवळला`
तीच उरात पुन्हा कळ उठली
पुन्हा नव्याने परिणीता नटली

रात पुनवेची हळुवार बहरली
दव बिंदुनी हर वेल ही भिजली
मदमस्त मंद रातराणी फुलली
आस पुन्हा दो नयनी सरली

एक शहारा हसून फुलला 
खळी  उमटली हळूच गाला
बघ ही कांती आसुसली तुजला
प्रीतिचा मोहर भरून सजला

आज नको ही सेज रिकामी
नको डोळ्यात विरहाचे पाणी
मंत्र मुग्धा ह्या वेळी सजणा
ओली पहाट लुटून ने ना....

…….श्वास तुझा रोमातुन भिनला
कंठ दो घडी नि:स्तब्ध  झाला
तूच जिवलगा  - की भास् हा माझा...
विरघळल़ी प्रेमिका……बाहुत घेना

चिम्ब भिजुनी हे रान हिरवळले
हर पातीला सूर गवसले

फुला फुलातून भवर बघ उड़ले
तन- मन माझे  तुझ्यात हरवले

एकच वादा आता हवा रे..
पुन्हा नको ही सल जीवा रे..
व्याकुळ हळवी सांज नको रे
ओठावर माझ्या तोष नको रे....

पुन्हा उमलेल  निशिगंध जेव्हा...
श्रृंगार असाच हा सजेल तेव्हा...
भेटशील तू मला पुन्हा रे कान्हा 
शत जन्मिची मी तुझी राधिका...

Saturday, 10 September 2011

On childhood love


 Iam trying to experiment with a new style of writing....its a different genre as compared to my earlier posts....
I have always been fascinated with the concept of childhood love - here through every stanza, the little girl grows up - reflected in what she offers to her beloved....


माझी एक छोटीशी भातुकली आहे

हवी तुला तर सारी घे

माझी जी अगदी लाडकी आहे

हवी तुला ती बाहुली घे


माझ्याकडे लक्ख चांदोबा आहे

हवा तुला तर चोरून ने

माझा टीम टीम तारा आहे 

हवा तुला तर तोडून ने


माझं सुंदर फुलपाखरू आहे 

हवे तुला तर पंख घे

माझ्या इंद्रधनुतून तुजला

हवे ते सारे रंग घे


नीळ भोर माझं आकाश आहे

हवी तर उंच भरारी घे

निखळ वाहणारा झरा हि आहे

हवे तर अमृत पाणी घे


सप्त सुरातले गाणे माझे

हवे ते सारे सूर ने

ओल्या माझ्या मातीतुन तू

हवा तो गंध टिपून  घे


सारे तुला मी देवू केले

सारं काही अर्पण केले

बालपणीची आस सख्यारे

आज हळूच सांगू दे..... 


हळवा होकार मनात आहे 

अलगद मला तू मीठित घे

दडवून ठेवलेले गुपित आहे 

हळुवार मला उलगडून दे...


Monday, 21 March 2011

For all the little girls from their moms

ती येणार त्या आधीच मी देवाकडे रोज प्रार्थना करायचे,
माझ्या पोटी मुलगीच दे - हट्ट धरून बसायचे.
लहानपणा पासून मला बाहुल्यांची खूप आवड...
आता खरीच बाहुली मिळावी म्हणून ही सारी धडपड !

मनात खूप बेत आखायचे... तिला असं नटवीन,तिला तसं घडवीन
माझ्या छोट्याश्या संसाराची तिला राजकन्या बनवीन
तिचा प्रत्येक बाळहट्ट आवर्जून पूर्ण करीन
प्राजक्ताच्या फुलासारखा तिला तळहातावर जपीन.

आणि खरच माझ्या घरी एक 'जापानी गुडिया' आली
येवून माझी दुनिया जादूमय करून गेली....
ती खरे-खुरे डोळे लुक्लुकायची - खर खुरं 'आ' करायची,
आणि सारखं माझ्याकडे बघून गोड गोड हसायची...

तिला नाहू-माखू घालताना मला वेळच पुरायचा नाही...
तिच सोनेरी रूप न्याहाळताना मला भानच रहायचं नाही
तिच्या बाल-लीलांमध्ये मी दिवस -रात्र रमले….
कि एके दिवशी "ही मोठी कधी झाली" म्हणून स्वतःच थक्क झाले !

'मोठं' होतानाचे तिचे प्रश्न, मला दुविधेत टाकायला लागले...
तिचा निरागसपणा कसा जोपासू-संभ्रमात पडायला लागले..
“आयुष्याची सारी सत्य तिला समजवायला हवीच-
मात्र तिच्या स्वछंदी जगण्यावर पाबंदी नको कधीच”.

हा तोल सांभाळताना आम्ही कधीतरी मैत्रिणी बनून गेलो….
जिवाभावाच्या गप्पांच्या,गुपितांच्या, सवंगडी होवून गेलो.
तिच्या माझ्या रस्त्यांच्या दिशा येवून मिळाल्या...
कारण पिढी जरी बदलली तरी भूमिका त्याच राहिल्या !

केव्हा तरी दोघींचे द्रीष्टीकोन विरुद्ध व्हायचे..
माझा सय्यम,तिचा आत्मविश्वास एकमेकांना टक्कर देवू पाहिचे..
अश्या वेळी मग दोघी मिळून त्यातून मार्ग नक्की ठरवायचो,
दोन अन दोन पाच होतील असा हिशोब शोधून काढायचो !

जीवनातल्या ह्या वळणावर आज मी स्वतःला समाधानी बघते..
माझी छोटीसी ‘राजकन्या’ आता ‘राजराणी’ होवून मिरवते...
माझ्या संस्कारांचा परिचय आपल्या वागणुकीतून देते
तिची आई असल्याचा अभिमान वारंवार घडवून आणते.

ही नदी अशीच पुढे वाहत राहणार..... नाही का !
आता लवकरच मी आजी होणार आहे - आणि हळूच एक गम्मत सांगू का ?
माझी लेकही 'बाहुलीच' मागतेय.....
आमचं नातं जणू पुढच्या पिढीला वारसा देवू बघतेय !

Tuesday, 8 March 2011

For the 'aai' I never knew...

आई मी तुला आधीपासून ओळखते...
"अजितला आई नाही " , ह्या संदर्भात जाणते.
पण आज मी तुझ्याशी नवीन नात जोडलय....
मी तुझ्या विकासला ' हो ' म्हंटलय !
आज पासून तुझ्या घराला मी माझं मानलंय
तुझ्या प्रत्येक नात्याशी स्वतःला गुंफलंय
हळूहळू मी ह्या सगळ्यांना ओळखीन...
हळुवारपणे सार्यांचं मन जिंकीन.........
..........पण आई तू कशी होतीस ग ?

आजच्या दिवशी तुझी खूप आठवण आली......
सूनमुखाच्या वेळी कुणी दुसऱ्यानच खीर दिली...
आजू बाजूचे चेहेरे ओळखीचे होते
पण पाणावलेले कडे तुझा शोध घेत होते....
गृह प्रवेश करून मी 'आपल्या ' घरी आले,
स्वागत थाटात व्हाव म्हणून सगळ्यांनीच कष्ट घेतले.....
..........पण आई तू कशी होतीस ग ?

आज बहुतेक विकासला तुझी खूप आठवण येतेय...
त्याला लागलंय न - बहुतेक खूप दुखतंय....
तसा तो खूप सहनशील आहे - हे मी का तुला सांगावं ? !
पण आई हवी असताना ' सखीनं ' काय करावं ?
खरच मी मनापासून प्रयत्न करते....
त्याचं छोटसं यशही खूप साजरा करते,त्याच्या डोळ्यातील प्रत्येक स्वप्नं आपल्या पापणीन टिपते,
तू काय केलं असतस असा विचार करते...... मग 'मैत्रीण' जरी रुसली तरी 'आई' समजून घेते !!
..........पण आई तू कशी होतीस ग ?

आज तुला एक गम्मत सांगायचिये....तुझ्या नातवंडाची आम्हाला चाहूल लागलीये...
मुलगा असेल कि मुलगी ग, माझ्यावर जाईल कि विकास वर ग ?
आम्ही दोघही आनंदानं अगदी हरख्लोय...
आणि जबाबदारीच्या जाणीवेनं थोडेसे घाबरलोय....
हे सगळं आम्हाला झेपेल न....आई-बाबा होणं आम्हाला समजेल न ?
आजूबाजूला तर केवढा उत्साह आहे...कोण किती लाड करेल, अक्षरशः स्पर्धा आहे...
आणि आज तर कौतुकाचा कहरच झालाय..
सगळ्यांनी मिळून डोहाळजेवणाचा कार्यक्रम थाटलाय.
झोपाळे , ओट्या , झाकलेल्या वाट्या...
कुठे काही कमी नको म्हणून धडपडल्या आहेत सार्या.....
............पण आई तू कशी होतीस ग ?

तुझी ‘ मुलीची’ हौस का, म्हणून घरात तीन नाती आल्या..
बहिणींना भाऊ हवा तर युवराजही झाला !
सगळ्यांची बार्शी,वाढदिवस गाजले...
कौतुकाचे सोहळे आशीर्वादानं भिजले....
वर्षान परी वर्ष लोटली....मुलांनीही नाती ओळखली...
तू नसूनही असतेस, त्यांनाही समजलं....प्रत्येक वेळी तुला आठवणीनं आठवलं !
............पण आई तू कशी होतीस ग ?

आई तुझ्या मुलांचा संसार सुखानं चाललाय..
रुसवा आहे , फुगवा आहे...समजुतीचा फेराही आहे....
वडीलधार्यांची सोबत आहे, कर्तव्याची जाणीव आहे,
सारं मनासारखं आहे ..आणि थोडं जास्त हवही आहे !!
पण कुठेतरी मनात एक रुख रुख आहे....समजत नाही अशी उसण आहे.
तृप्तीच्या वर्षावात काहीतरी सलतंय...शोधूनही सापडत नाही , असं काहीतरी हरवलंय....
कितीही रोकलं तरी मनात एक प्रश्न आहेच.....आई तू कशी होतीस ग ?

देवकी आिण यशोदा

देवकी - मी यशोदा - पण तू मला ओळखत नाहीस
तुझ्या बाबतीतही मी हे म्हणू शकते - पण ते फारसं खरं नाही...
तू नक्की कोण ते माहित नसलं तरी तुझा कान्हा माझ्या कुशीत आहे,
तुला मात्र मीच काय,तुझं तान्ह बाळही परकंय !

तुझं माझं नशीब बघ कसं गुंतलंय
जे तुला नको होतं, ते माझं वरदान ठरलंय !
तू तोडलेले पाश - त्यांनी मला आई बनवलंय
एका घटकेत 'तुझं' बाळ, 'माझं' होवून गेलंय

तुझ्या वरती रोष धरू - कि मनापासून आभार मानू ?
तुला तेजाची उत्पत्ती म्हणू कि सूर्याचं ग्रहण ठरवू ?
तुला शोधण्याचा प्रयत्न करू -
कि तुझं अस्तित्वच नाही - हा निश्चय करून टाकू ?

मी बाळामध्ये खूप रमलेय..पण मधूनच तू डोकावतेस
तुला कधीच पाहिलं नसलं तरी तुझं रूप मी रोज न्याहळते...
हे डोळे,हे नाक कुणाचे - स्वतःला थोडं तरी त्यात शोधते...
शेवटी - "ह्यावर फक्त माझाच हक्क आहे" म्हणून बाळाला घट्ट कवटाळते...

बाळानी येवून माझ्या आयुष्यातली 'आज' किती बहर्लीये
मागचा सारं विसरून,मला 'उद्याची' आस दिलीये...
मातृत्वाचा असीम आनंद पदोपदी अनुभवतेय..
बाळासाठी आसुसलेली 'आई' तृप्त होतेय...

मात्र ह्या लक्ख सुख-सोहळ्यात,तुझी सावली मधेच पडते...
मनात दडवून ठेवलेली भीती - डंख मारून जाते...
कधीतरी अचानक परत येशील का ? माझ्या ममतेवर हक्क गाजवशील का ?
आणि शेवटी "जननी मीच" म्हणून माझी ओटी रिक्त करून जाशील का ?

यशोदा - मी देवकी - तू कुठे ओळखलं आहेस मला !
मात्र माझा अंश तुझ्यात रुजवून, मी तुझ्याशी बांधून टाकलाय स्वतःला !!
तुझं माझं रूप एकच आहे - मग मी परकी कशी ?
तुझं -माझं अस्तित्व एकच आहे - मग स्पर्धा कशी ??

बाळ तुझं वरदान आहेच...पण तू माझं सौभाग्य आहेस...
तुझ्यामुळे त्याला 'आई' मिळाली आहे - मला आणि काय हवंय ?
तुझं- माझं , माझं -तुझं - कदाचित हा हीशोबच प्राप्त नाहीए
ममता, प्रेम,मायेची - कधी का वाटणी झालीये ?

माझ्यावरचा रोषही तुझ्या 'आईपणाची' साक्ष देतो
तुझ्या बाळाला मी पोरकं केलं - तुझा हाच न राग होतो ?
आभाराचं तर बोलूच नकोस - अमाप उपकार तुझे आहेत..
आणि मला शोधू तर अजिबात नकोस - मी तुझ्यातच विलीन आहे....

हो, त्याचं रूप अगदी माझ्यासारखं आहे...
त्याच्या सौंदर्याला आकार मात्र तू दिलेला आहेस...
मान्य त्याचे डोळे अगदी माझ्यासारखे आहेत...
त्यातलं प्रांजळ प्रेम मात्र वेडे फक्त तुझ्यासाठी आहे !!

'काल' नेहमीच निघून गेलेला असतो....तो 'उद्या' येत नाही...
पण 'आज' उद्याची चिंता करून - कोणाला मुक्ती मिळत नाही...!
तुझ्या सौख्यात पडणारी सावली तुझ्या मायेचीच आहे बाई…..
एका आईच्या आनंदाला दुसरीची द्रिष्ट लागत नाही !!

मी गेले आहे कुठे कधी - की परत फिरून येईन माघारी...
स्वतःला तुझ्यात पेरून,मी कधीच स्वीकार्लीये समाधी !
ज्या क्षणी बाळान तुला 'आई' म्हंटल - सारं काही ठरलं तेव्हाच
मी फक्त निमित्त होते - हा मातृत्वाचा ठेवा तुझाच !!

Monday, 7 March 2011

for my aai ....and all daughters

कळलच नाही तुझ्या सावलीतून कधी बाहेर पडले....
तू तर नेहमी अशीलाच भवती ह्या बेफिकीरीत वावरले.
कर्तुत्वाच्या झोपल्यावर उंच उंच उडले - तुला सोडून,बंधनं तोडून, स्वतःमध्येच रमले...
मनासारखा जोडीदार मिळाला,तूर्तताहा तुला विसरलेच...

पण आज अचानक असा काही झालंय,
तुझं - माझ नातं नव्यानी उमगतंय..
आई,"मी आई होणार आहे", - कसं व्यक्त करू मला काय वाटतंय
एकच गोष्ट नक्की मात्र,तुझं रूप डोळ्यापुढे वारंवार तरंग्तंय

बाळाची प्रत्येक हालचाल मला थक्क करून सोडतेय
माझ्यात एक जीव वाढतोय जाणीव करून देतेय...
मी बाळाशी खूप बोलते,आई, तुही माझ्याशी बोलायचीस न
मी जशी बाळाला हळुवार वाढवतेय ,तुही मला असच जपायचीस न?

बाळ कुशीत आल्यावर सार्या वेदना विसरले
हा माझा अंश आहे,ह्या जाणीवेनं फुलारले...
असह्य ह्या कळा तुही सहन केल्यास न
पण चुकनही कधी बोलली नाहीस, आज लक्षात येतंय ग...

कितीतरी रात्र बाळ जागवतय किव्वा खरं सांगायच तर मलाच जागायचंय
शांत झोपलेल्या पिल्लाकडे टक लावून बघायचंय, आणि जरा हालचाल केली त्यान तर लगेच मांडीत घ्यायचय
अश्या किती रात्र तू जागली असशील,ह्यात काय शंका आहे...
माझा प्रत्येक श्वास टिपला असशील,कोणी हिशोब ठेवलाय?

हळूहळू मुलं मोठी होतायत...माझ्या प्रत्येक क्षणावर हक्क गाजवतायेत
त्यांचे वाढदिवस,त्यांच्या शाळा,कधी गोवर तर कधी कांजिण्या...
माझं अस्तित्वच जणू त्यांच्यात हरवलय....तक्रार नाहीये हि....
ह्या हरव्ण्यातही खूप आनंद आहे, खरच सांगतेय मी....

मात्र ह्या जाणीवेतून आई, खूप काही सांगायचं तुला...
आधी कधीही बोलले नाही,ते व्यक्त करायचंय मला..
आज प्रकर्षानं जाणवतंय माझ्यासाठी निस्वार्थ मिटण तुझं..
आणि ओशाळून आठवतंय अल्हड वयातल अवखळ वागणं माझं....

तुझं रागावणं,तुझं समजावणं,तुझं प्रत्येक ध्येय माझ्यासाठी....
आणि माझं चिडणं, रुसून बसणं,प्रत्येक गैरसमज हट्टासाठी.....
आज तुझ्या जागी आल्यावर तुझी धडपड समजतेय...
आपण आईला समजलोच नाही, हि जाणीवही होतेय...

तू चाललेल्या वाटेवर आता मी चालतेय..
वेश बदलून,गाव बदलून,पुन्हा आईच बनतेय!
तेच संघर्ष,तेच प्रश्न,तेच समर्पणही अनुभवतेय...
आणि ह्या रुपानं का होईना कदाचित थोडंस तुझं ऋणही फेडतेय........

For my baba..and all the 'princesses'

"बाबा, मी तुझी राजकन्या आणि तू माझा राजा
भातुकलीतला नाही बरं, खर्या आयुष्यातला"

आईन गुपित सांगितल्यावर किती किती आनंद्लास
माझी वाट बघण्यात मग आपला प्रत्येक क्षण घालवलास....
माझा पहिलं रडणं ऐकल्यावर हसता हसता रडलास
कुशीत नंतर  मला घेवून जगभर मिरवलास

आईला डोळा लागावा म्हणून माझ्या बरोबर जागलास
रात्र नाही पहाट नाही मनसोक्त खेळलास
इवलेसे माझे हात पाय, नवलाईन न्याहाळलेस
स्वतःला माझ्यात शोधताना तासंतास घालवलेस

पहिलं पाऊल माझं पडलं आणि जणू जग तू जिंकलस
पहिला तोल गेल्यावर कसं घट्ट कवटाळून धर्लस
पायात बळ नसताना - हात तुझाच धरला....
उंच भरारी मारताना विश्वास तुझ्याच वर ठेवला

सप्तपदीची सात पावलं सख्या सवे चालले 
माहेरचे घरटे सोडून तुझ्या चिमणीने पंख पसरले ….
डोळ्यातील भाव तुझे तेव्हा खूप काही सांगून गेले..
काळजाचा तुकडा सोपवताना त्याला घाव किती ते पडले...

छोटं बाळ तुझं - तिच्या कडे आता बाळ येणार..
बाबाच्या भूमिकेतून आजोबा तू होणार...
माझा संसार, माझी मुलं - आयुष्यातलं सार चैतन्य
माझ्याच नाही तर तुझ्या ही रे - जीवनाच हे साफल्य...

काळ मात्र आपली साक्ष देतो - आपण कसे त्यातून सुटणार..
माझ्या बाबाचा खंबीर हात , थोडासा थरथरणार
चेहेर्या वरच्या सुरकुत्या खूप काही सांगणार...
चालताना पावलांची, गती मंद होणार...

पण आजही दमून विसावयाला तुझ्याच मिठीत यायचा आहे...
डोक्यावरून हात फिरल्यावर बालपण पुन्हा जगायचा आहे..
तू सांगायचास ती काऊची गोष्ट परत ऐकायची आहे..
हळूच तुझ्या कानात तुला पुन्हा सांगायचं आहे...

"बाबा, मी तुझी राजकन्या आणि तू माझा राजा
भातुकलीतला नाही बरं, खर्या आयुष्यातला"