Tuesday, 1 January 2013

a mother's farewell to her young children

मुलांनो, तुमच्यासाठी जन्माची शिदोरी बांधून ठेवतेय…
आज जमेल त्या शब्दात तुम्हाला 'आई' देवून जातेय..
आता कधीही माझी जायची वेळ येईल...
त्यावेळी कदाचित शब्द फुटणार नाहीत आणि मनातलं सारं मनातच राहील.

माझ्यावर रागावू नका हं - मी खरच खूप प्रयत्न केला
फक्त मनोबळाच्या जोरावर मृत्यूला झगडा दिला…
मात्र आता ह्या लढाईत मी थकत चालले आहे....
नाईलाजाने का होईना शस्त्र टाकत चालले आहे.

मला माहिती आहे - माझ्या जाण्याची चाहूल तुम्हाला कासावीस करतेय
माझ्यासमोर दर्शवल नाहीत तरी रोज उशी भिजव्तेय….
खूप लहानश्या वयात जगातल मोठसं सत्य पचवायचा आहे तुम्हाला
अशक्य वाटलं तरी लवकरच 'ओ' येणार नाहीये, तुमच्या "आई” ह्या हाकेला..

सुरुवातीला तुम्हाला माझी पदोपदी आठवण येईल
प्रत्येक छोट्या गोष्टीत, मी नाहीये,पुन्हा पुन्हा जाणीव होईल
कपडे सापडणार नाहीत, पुस्तकं मिळणार नाहीत,वस्तू दिसणार नाही..
एवढच काय तर, सकाळचं दुध कसं बनवायचं,हे सुद्धा सुचणार नाही !!

पण हळू हळू तुम्ही सारं काही शिकाल
आजवर जे सांगितलं ते तेव्हा जाऊन ऐकाल !
दप्तर जागेवर ठेवाल,हात-पाय धुवून स्वतःच वाढून घ्याल
आणि आई ओरडायच्या आधी पटकन अभ्यासालाही बसाल !

चला, आज आपण सारे मिळून आणखी एक गोष्ट ठरवूया...
फक्त सुंदरच आठवणी जोपासायच्या,हा निश्चय करून टाकूया.
एकमेकांच्या सहवासातल भरपूर प्रेम तेवढं आठवायचं
आई नाहीये पेक्षा ती काय सांगून गेली,तेच नेहमी स्मरायच

बाळांनो खूप मोठ्ठा व्हायचं - मानानं आणि मनानही बरं का !
स्वार्थ कधीच समाधान देत नाही,नेहमी लक्षात ठेवाल ना ?
कर्तुत्वाच्या जोरावर जगात खूप प्रसिद्धी मिळवा…
मात्र कशाच्याही आधी - “एक चांगला माणूस” - ही कीर्ती कमवा

आयुष्यात अनेक अनुभव येतील...
फसवणुकीचे,खोटेपणाचे कुरूप चेहेरे दिसतील
त्या सगळ्या मधून तुम्हाला सौख्याच निर्मळ रूप शोधायचंय
अपयशाचे काटे निवडून फक्त यश तेवढ स्वीकारायचंय

कुणाशीही मैत्री करताना मन अगदी मोकळं ठेवा
आणि एकदा 'आपलं' मानल्यावर,कायमचा साथ निभवा
नाजूक नात्यांच्या लडीत कधीच अहंकार पिरू नका...
गर्वाचा नेहमी नाशच होतो हा धडा कधीही विसरू नका...

मी शरीरान कदाचित दिसेनाशी होणार आहे....
पण डोळे बंद केलेत तर नेहमीच समोर असणारे
प्रत्येक वळणावर माझी शिदोरी तुमची तहान-भूक भागवेल…
आणि एके दिवशी आपल नातं अस्तित्वाच्या सार्या सीमा ओलांडेल

बघाच तुम्ही,दिवस कसे भुर्रकन उडून जातील...
बघता बघता माझी मुलं आपला स्वतःचा संसार मांडतील…
त्या तृप्त वेळी एका छवितून मी मंदशी हसीन….
माझ्या बहरलेल्या वेलीची द्रिष्ट काढून टाकीन !

4 comments:

  1. Reshma stop making us cry yaar....another gem of a piece, chapne ka socha hai kya??

    ReplyDelete
  2. Haan yaar Reshma...bohot sundar. pratyek ole vachatana Kishori maushi dolya pudhe yet hoti. Dont forget about the copyright thing.

    ReplyDelete
  3. beautiful. You've got the essence.
    I remembered Aai is the 1st 2 stanzas. She wanted to say so many things in the last few days. She gave me the most valuable things though - her blessings by placing her hands on my head 4 days before she moved on. I will always cherish that and many other wonderful moments I've had with her.

    ReplyDelete
  4. Seriously Reshma stop making us cry..
    I am totally amazed and feel proud of u yaar..

    Awesome!!

    ReplyDelete