Tuesday, 16 September 2014

रागे रागे रुसली , उगा हिरमुसली 
हास ना  - थोडीशी 

खोटी खोटी खिजली ,कोपऱ्यात बसली 
बोल ना -थोडीशी 

मोडी मोडी चालली, वाट चुकवली 
वळ ना -थोडीशी 

जाणे जाणे भुलली ,भली विसरली 
भेट ना - थोडीशी 

मुसु मुसु रडली ,माझ्यावर चिडली 
माफी ? -थोडीशी 

गाली गाली हसली, आता कशी फसली 
लाज ना  - थोडीशी 

कळी कळी खुलली -बघ विरघळली 
बिलग ना  - थोडीशी….

Saturday, 13 September 2014

उंच नेतोय आकाशी 
हा झोका माझा सावर रे 
दूर  नेतोय तुझ्यापासुनी 
वाऱ्याला ह्या आवर रे ...

मेघ दाटले बघ हे 
करतील ओले चिंब 
उभे जळेल परिही 
अंग माझे - अन अंतरंग !

निजली शांत माझी 
आभा तुझ्या कवेत
सांगू काय तिला मी 
का झाला स्वप्नभंग...

विरह सोसेन कशीही 
तुझा श्वास माझ्या रोमात 
पण होवू कशी मी त्याची 
मन माझे - तुझ्या मनात !

सोडून आले तरीही 
पाळला तुझाच शब्द 
'तोडून जा" म्हणालास 
"विसर सारे बंध" !

नवा जन्म स्वीकारला मी 
रुजले नवीन मातीत 
फुलले - बहरलेही … 
निभावला हर एक धर्म ...

पण  येते फिरून जेव्हाही ,
ह्या झोक्याच्या अंगणात ...
बकुळ देवून जाते 
तुझ्या आठवणींचा गंध !

तेंव्हा,उर माझे मुकेच रडते 
मग उगाच थोडे हसते … 
कधी एक रूप दोन वाटा 
आता  - विश्वही झाले भिन्न !

Friday, 27 June 2014

तुझ्या मिठीचा ग वास

आई माझ्या भोवती 
कायम तुझा आभास 
आजही माझ्या श्वासात 
तुझ्या मिठीचा  वास...

भिजल्या माझ्या मनाला 
तुझ्या पदराची आस 
कुशीत घेवून थोपटशील 
अजून होतो भास !

कानी माझ्या घुमतो 
तुझ्या बांगड्यांचा नाद 
अंगाईच्या गाण्यात 
तुझ्या मायेचा गं साज ...

अजून शोधतो रोज 
तुझ्या कुशीचा मी ठाव 
प्रेमाच्या त्या नजरेत 
तुझ्या रागाचा तो आव !

संध्याकाळी कातरवेळी 
एकटीच माझी सावली 
अंगणतली वेलही पुसते 
कुठे रे ती माउली !

देवघरातला दिवा विचारतो 
कशी रे विजली वात
कोमेजलेली तुळस घालते 
केविलवाणी साद !

दारच्या उंबरठ्याला 
त्याच्या लक्ष्मीची आस
घरची हर एक भिंत सांगते 
इथेच तिचा  वास”...

कणखर होता बाबा माझा 
व्याकूळ झाला बघ किती 
अबोल झुरतो ,अजून शोधतो 
कुठे हरवली त्याची सखी !

मधेच हाक देशील कधी 
आतूर बघतोय वाट… 
 ये ग आई, पूस ग माझ्या
आसवांची लाट