अधीर समय तू धर धीर
हा काळ कठीण तू हो खंबीर
माय लांब, भूमीही लांब
उसळते मनात चिंतेची लाट
काळीज तिथे अन् श्वास इथे
साधावा कसा तू हा समतोल
सात समुद्राचे हे अंतर ,
व्याकूळ करते खोल - खोल
परदेशी आलो, का आलो?
हा प्रश्न मनाला सलतो ना
पण स्वप्न तुझे एकट्याचे नव्हते
ध्यास सर्वांचा होता हा !
मातीत नव्या रूजणे ना सोपे
संस्कार तरी जपलेस तू
जुन्या नव्याचे धागे विणूनी
सामराज्य उभारले तुझेच तू
सौख्याच्या मागचे कष्ट तुझे पण
समजेल कधी रे केव्हा कोण
परम सत्य हे जग बघ विसरे-
घुसळल्या परी,मिळते ना लोण !
भेटशील पुन्हा, बिलगशील पुन्हा
खंत नकोरे करूस तू
समय कठीण हा असेल जरीही
झुंज देणारा कणखर तू !
सावर चल मग, घे तू उभारी
नको ढासळू पळभर तू
घे राम नाम, तो करेल छान
नको जरा डगमगूस तू !