दिस सरताना उमगत नाही
काळ निसटत जातो आहे
अंकुर माझे लहान चिमुकले
नकळत उमलत बहरत आहे
रात- रात्र जागवतो जेव्हा
"बाळा नीजरे" म्हणते आई-
कुशीत आता येशील केव्हा
ओठावर थिजली अंगाई...
घास चिमुकले भरवीत असता
घर भर मागे पळता पळता
"हरले, दमले, खा ना स्वतःने "
का मी म्हंटले, स्मरते आता
आंघोळ, दूध अन दुपटे वाळे
झबले, कुंच्या, टीट काळे -
कधी मी ह्यातून बाहेर पडले
काल न कडेवर घेऊन फिरले !
गडबड घाई तुझी सदैव
माझे 'मी'पण तुलाच अर्पण
आज मोकळी झाले मग का
पुन्हा हवेसे वाटे बंधन
बघ माया ही कशी बिलंदर
पंख पिल्लाचे करते कणखर
झुरते, रडते व्याकूळ होते
पण, "घे तू भरारी", हासत म्हणते
उड आकाशी, उंच फिर तू
पड, झड, पण हरू नको तू
हो मोठा हो ताकतवर तू
आनंदाने जग स्वैर तू
पण कधी लागला तुला विसावा
आले जर का कधी रडाया
असेलच आई उंबरठ्यावर
मीठ-मोहरीने द्रिष्ट काढाया !
No comments:
Post a Comment