सुखी माणसाचा हा सदरा
घालून बाबा जगतो
जाईल जिकडे तिथे अनंत
आनंद आणवतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
नको हरू तू नको बसू तू
आठव बाबा देतो
सामर्थ्याचा मोळविक्या हा
दैवाला पण भिडतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
वाघासम बघ बळ असावे
बाबा हे दाखवतो
नैराश्यावर मात करावी
आशा तो बाळगतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
कुणी असेना कुणी नसेना
स्वतःमध्ये हा रमतो
सांज सकाळी उत्सव त्याच्या
भवती पिंगा धरतो !
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
मित्राचा हा मित्र खरा हा
जीव जीवाला देतो
तिसऱ्याला पण हासत आपल्या
घरात जागा देतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
साईंचा हा भक्त खरा जो
नमन तयांना करतो
नाही मागत पै पैसा हा
जप मुल्लांना म्हणतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
जगण्याचा हा मंत्र आम्हाला
बाबा नेहमी देतो
हसत रहा रे फुलत रहा रे
आसू शत्रू ठरतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
नसेल मोठा नसेल रुतबा
बाबा माझा साधा
पण माझ्या आणि ताईच्या तो
माहेराचा राजा
सुखी माणसाचा हा सदरा
घालून बाबा जगतो
जाईल जिकडे तिथे अनंत
आनंद आणवतो
॥ आजही माझा बाबा उटणे
सुवासिक ते विकतो ॥
No comments:
Post a Comment