Monday, 1 October 2018

चिरंजीव होवो जन्म 
आजन्म हाच उमंग 
गुंतून मनात बहरावे
हे बंध रेश्माचे ! 


मी :
सहज ओळख करून देताना म्हणालास ,
"ही माझी मैत्रीण"
निनादला तो शब्द कानात -
पण त्याचा अर्थ समजावून सांगशील ? 
तो :
मैत्रीण - ही ओळखच किती गोड आहे
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे 
न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे
हलकंसं हसली जरी - संवाद परिपुर्ण आहे !
मनातलं सारं उमगावं , तिच्या डोळ्यातच तो ठाव आहे
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे 
साऱ्या नात्यांहून सोवळा - तिचा आगळाच एक मान आहे
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे 
ती नसली जरी भवती तरी सुंदरसा भास आहे
मनामध्ये रुजलेली कृष्णेचीच आस आहे 
ओळखीच्या गर्दीत ती एकटीच उभी छान आहे
मन मोकळं वागावं - मी तिच्या सवे लहान आहे !
अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे
पूर्णत्व नकोच,तिची त्यातच खरी बात आहे.....





सखा - ही ओळखच किती गोड आहे
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे 
न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे
हलकंसं हसला जरी - संवाद परिपुर्ण आहे !
मनातलं सारं उमगावं , त्याच्या डोळ्यातच तो ठाव आहे
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे 
साऱ्या नात्यांहून सोवळा - त्याचा आगळाच एक मान आहे
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे 
तो नसला जरी भवती तरी सुंदरसा भास आहे
मनामध्ये रुजलेला श्रीरंग तोच आहे 
ओळखीच्या गर्दीत तो एकटाच उभा छान आहे
मन मोकळं वागावं - मी त्याच्या सवे लहान आहे !
अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे
पूर्णत्व नकोचरे.....हा प्रवासच फार गोड आहे 

No comments:

Post a Comment