Monday, 1 October 2018

This was written for Akka maushi and Appa kaka - on the first valentine after kaka passed away after maushi, but I think i had it in mind even as a 7th grade student when i saw my aaba passing away inch by inch yearning for my departed aaji. No red roses , no romantic candle lit dinners for this couple but the love between them couldn't keep them apart for long....ह्यालाच म्हणतात का ग Valentine ?
आठवतायेत ते दिवस ? नुकतेच आपण भेटलो होतो - 
अस्पष्टच थोडसं पण गालातल्या गालात हसलो होतो … 
नजरेनच एकमेकांच्या मनातलं सारं ओळखत होतो 
समोरासमोर आलो नुसते तरी मनोमन मोहरत होतो ! 
प्रेमाचं आपलं बंधन लग्नाच्या मांडवात घट्ट झालं
मी तुझा नि तू माझी - जन्मोजन्मीच सत्य झालं
तुझी अनेक रूपं रोज मी नव्या नवलाईने न्याहाळत होतो
कले कलेने बहरत होतीस - मी मंत्रमुग्ध बघत होतो !
मुलांचा चीवचीवाट , आई-वडिलांची साथ 
नौकरी , पगार ,जगराहटी - दिवसा मागे रात ! 
मनात होता विश्वास आणि हातात तुझा घट्ट हात 
प्रसन्नपणे तेवत होती आपल्या सुखी संसाराची वात 
सारं कुठे गुलाबी होतं ?! काट्यातूनही चाललो आपण 
आठवतं का -बिछान्यात, पाठ फिरवून रात्रभर केलेलं जाग्रण ?
पण तो रुसवा , तो फुगवा, क्षण भराचा होता
मनवण्याचा सोहळा त्यानंतर किती रात्र चालला ! 
जावई , सुना ,नातवंड आलीत - घरातले 'मोठे ' आता आपण झालो.
पण खरं सांगायचं तर मनातून मात्र, तेच प्रेमी युगल राहिलो ! 
एकत्रच डोळे मिटायचे , असं एकमेकांना नक्की ठेवलं होतं सांगून
पण दोघांनाही माहिती होतं - गेला पुढे एक - तर दुसरा घेईल सावरून...
श्वासात भिनलेली तू - सोडून गेलीस हे पटलंच नाही…
मात्र आयुष्य परिपूर्ण आपलं म्हणून दुखः त्याचं मी केलंच नाही … 
आज पुनर्भेटीच्या वेळी , पुन्हा तुझा होवून येईन - 
अन मोक्ष स्वीकारण्यासाठी देवापुढे सज्ज उभा राहीन ! 
…………ह्यालाच म्हणतात का ग - 'Valentine' ?

No comments:

Post a Comment