Tuesday, 10 March 2020

Amhi Bhadekaru

ठुबक साजरं, सुबक ते होतं
मागे पुढे म्हणायला आंगणही होतं
पहाताच वाटलं किती गोजिरं हे आहे
छोटंसं का होईना पण आपलंच आहे
थोडं कोलमडलेलं होतं, थोडं डागाळेलं होतं
रांटी गवताने, घट्ट वेढलेलं होतं
लोक राहटीपरी देखणं तर नव्हतंच
पण मना मध्ये आमच्या, आमचं घरकुल होतं
प्रेमा प्रेमाने भिंती पुन्हा त्याच्या उभारल्या
शेणा - मातीने काळ्या, रोज रोज सारवल्या
काटेरी वाटेत वेली- फुलं उगवली
बागे बरोबर तिथे, आता आशा उमलली
ओसरीवर त्याच्या किती रहिवाटी आले
गूळ फुटाणे, साखर- पाणी घेवून गेले
काही ज्यादा विसावले, काही चटकन गेले
पण छपराने आसरा न चुकता देवू केले
सणा-सुदीला त्याला आम्ही मानाने नटवलं
दिवे-सुवासाने हौसे- हौसेने सजवलं
कणा-कणात मुरलो ,भिंती भिंतीत रुजलो
समाधानाने आम्ही त्या घरात नांदलो
पण एके दिवशी पहा, असे आभाळ फुटले
कुणास ठाउक कसे पण काहूर माजले
एक लाट अशी आली, घर पाडून दूर गेली
उभ्या वासतूच्या जागी ओली माती ठेवून गेली
आसवं ही कोरडी, कशी कशी ती आवरू
देवाची रे मर्जी- चल घर नव्याने उभारू.
पण खोटीच ती आशा, फोल तो विश्वास
घर मातीचेच होते अन् आम्ही - भाडेकरू....

No comments:

Post a Comment