Cook A Curry' - Ready to mix oil based curry paste, अतिशय प्रोत्साहनकारक feecback मिळालेलं आमचं नवीन product, अवघ्या काही मिंटातच अस्सल Indian taste देणारी जादू, की आईचं स्वप्न पूर्ण करण्याची आमची जिद्द- ह्या पैकी नेमकं काय आहे Cook A Curry? मला विचाराल तर सगळच!
कुठलंस एक स्वप्न असतं मनात- ते पूर्ण करण्याचा एक निश्चयही असतो आणि अअचानक एके दिवशी तो निश्चय कल्पनेतून वास्तवात उतरतो! तसंच काहीतरी झालं साधारण वर्षभरा पूर्वी- घरातल्या trials, नाव काय ठेवायचं ह्यावर चर्चा, company registration, council clearances, lab checks, मग product ll काही दिवसातच launch - त्याचीच तयारी करायला काल wholesale depot मधे गेलो होतो- सगळं सामान आणलं- Business ला लागणारं आणि घरचं देखील. का कुणास ठाऊक पण एक वेगळाच उत्साह येतो माझ्यात, किराणा माल भरताना...एक वेगळाच आनंद होतो...ते सगळं सामान घरी आणायचं, सगळे डबे काढून, वरचं खाली, खालचं वरती होइल अश्या रीतीने नवीन पाकिटं फोडून, सगळं ज्याच्या त्याच्या डब्यात भरायचं, मग ते लख्खं धुतलेले डबे पुन्हा छान जागेवर लावायचे....रमते मी अक्षरशः ह्या सोहळ्यात...
काल तर केवढं सामान होतं माझ्या भोवती. मी ते सगळं व्यवस्थित लावत होते. घरचं वेगळं ठेवत होते, Business साठी लागणारं inventory stock प्रमाणे लावत होते, यादीतलं सगळं व्यवस्थित आलंय न तपासत होते आणि अचानक ते ओळखीचं feeling सहज मनात डोकावलं- " केवढी ती देवाची कृपा - घरातल्या कोठ्या धान्यानं भरल्या जातायेत; घरातली मुलं, वयस्क, पै पाहुणा, येणारा-जाणारा, कधी माझ्या घरात रिकाम्या पोटी राहणार नाही." ही समाधानाची भावना मला कृतज्ञतेच्या परमोच्च शिखरावर घेऊन गेली आणि नेहमी प्रमाणे डोळे आपोआप पाण्याने भरून आले... खरं तर ही समृद्धी नवीन का होती माझ्यासाठी?! आईच्या पिढीसारखं, महिन्यातून एकदाच किराणा भरायचा आणि महिना अखेरीपर्यंत तो टिकवायचा हा नियम माझ्या संसारात कधीच लागू पडला नव्हता - मनात येईल तो पदार्थ बनवायचा ; त्याला लागणारं सामान, कितीही महाग असलं तरी हवं तेवढं, हवं तेव्हा आणायचं- काटकसर नाही का सगळं सांभाळून, मोजून मापून करण्याचं बंधन नाही...
पण तरीही दर वेळी किराणा भरताना ताईने लग्नाच्या वेळी गौरीहर पुजताना सांगितलेली प्रार्थना आणि "मनापासून म्हण बरं ही " हा दिलेला प्रेमळ सल्ला आठवल्याशिवाय माझे डबे काही जागच्या जागी जात नाहीत !
हे माझं अन्न -धान्याने भरलेलं घर , त्या अन्नपूर्णेच्या मनापासून केलेल्या आराधनेचा परिणाम, की माणसात देव बघणाऱ्या आमच्या दोघांच्याही आई बाबांची पुण्याई ? का दोन्ही ? का अनेक वर्षांपूर्वी त्या काकांनी मनापासून दिलेल्या निखळ आशीर्वादाचं स्वरूप ?
ते काका आज कुठे आहे, कसे आहेत, मला माहिती नाही पण ५ -६ वर्षांच्या मला तेव्हाही कुठं काही जास्त माहित होतं ? आम्ही कलकत्ता सोडून कायमचे नागपूरला का आलो , आजी आबा आता सारखे का भेटणार नाहीत , तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती काय होती, आत्ता काय आहे ; आपले आई बाबा कुठल्या दिव्याला सामोरी जातायेत हे सगळं कळण्याचं वयच नव्हतं - पण एवढं कळत होतं - आता आई बाबांकडे हट्ट नाही करायचा कुठल्या वस्तू साठी - त्यांना त्रास होतो -नाही म्हणता येत नाही पण आणून पण देता येत नाही -मग त्यांना वाईट वाटतं; पण गम्मत म्हणजे हे समजल्यावर त्याचं दुःख व्हावं एवढं सुद्धा वय नव्हतं माझं !
नवीन जागा, नवीन मित्र-मैत्रिणी , घरासमोरची ही भली मोठी गच्ची आणि बाबांना रस्त्यावर सापडलेलं alsatian पिल्लू - आमचा टायगर ! ह्या सगळ्या मध्ये आई बाबांची चाललेली कसरत माझ्या ठायी सुद्धा नव्हती ...मात्र ठायी ठायी भिनला होता तो नागपूरचा पहिला उन्हाळा - होरपळून निघालो होतो आम्ही सगळे.....आणि असाच तो May महिन्यातला दिवस सुरु झाला - तापलेला , अंगातली शक्ती खेचून मलूल करून टाकणारा - सारं चिडिचूप -एक पान हलत नव्हतं कि रस्त्यावर एक काळं कुत्रं दिसत नव्हतं - मिळेल त्या सावलीत , त्या रणरणत्या उन्हापासून प्रत्येक जण आश्रय घेत होतं . आमची समोरची खोली त्या मानाने थंड असायची, म्हणून मी आणि टायगर तिथेच लोळत पडलो होतो ; ताई आपल्याच कुठल्या कामात दंग होती आणि रात्री काही पाहुणे जेवायला येणार म्हणून आई स्वयंपाकघरात होती.तेवढ्यात एक अनोळखी काका दारात येऊन उभे राहिले - घामाघूम, चुरगळलेले कपडे , हातात एक छोटीशी बॅग आणि खूप खूप दमलेले.. "अलका कुळकर्णी ,मामा चितळ्यांची मुलगी , इथेच राहतात का ? " असं त्यांनी विचारल्यावर , मी धूम आत पळ ठोकली आणि मग आईच्या मागे मागे बाहेर आले .त्यांनी आईला एक पत्र दिलं - आबांचं ,माझ्या आईच्या वडिलांचं होतं ते. हे काका कलकत्त्याहून आले होते आणि आबांनी आईचा पत्ता दिला होता त्यांना एवढंच कळलं मला त्या वेळी. आईने त्यांचं चहा पाणी केलं मग ते काका निघाले. जिना उतरून ते फाटकापर्यंत पोचले असतील नसतील , तसं आईला काहीतरी सुचलं आणि तिने ताईला, धावत जाऊन त्या काकांना परत घरी घेवून यायला सांगितलं. ते काका आल्यावर आई म्हणाली, "माफ करा ,मी तुम्हाला जेवायचं विचारलंच नाही - अगदी भान राहिलं नाही मला - मी पान घेते , तुम्ही फ्रेश व्हा आणि जेवायला बसा."
"दुपारी तीन वाजता कोणी जेवतं का, " हा विचार आलेला आठवतोय मला पण त्या नंतरची आठवण मात्र मी बहुतेक मरेपर्यंत कधी विसरणार नाही ..ते काका जेवायला बसले , आणि घळाघळा रडायला लागले - एक घास घ्यायचे, डोळे पुसायचे; परत एक घास घ्यायचे , परत डोळे पुसायचे ... मला तर काही कळतच नव्हतं - का बरं रडत असावेत ? आईच्या डोळ्यातूनही झर झर पाणी वाहात होतं , ताई पण गंभीर झाली होती - समजत नव्हतं ते मला आणि टायगरलाच !
मग समज आल्यावर आईने एकदा सगळी हकीकत सांगितली - त्या काकांनी गुंतवलेला त्यांचा सगळा पैसा अचानक बुडला होता -रातोरात रस्त्यावर आलं होतं कुटुंब - एवढं की एक वेळच्या जेवणालाही मोताद झालं होतं! कलकत्त्याहून निघाले, नागपूरजवळच्या कुठल्याश्या खेडेगावात बायकोला,मुलाला सोडलं कुणा नातेवाईकांपाशी मग आमच्या घरी येऊन परत कलकत्त्याला जाणार होते तिथलं निस्तरायला. दोन दिवसांचा उपाशी होता माणूस - वणवा पेटल्या सारख्या त्या नागपूरच्या धगीत, आमचा पत्ता शोधत वण वण फिरला होता गृहस्थ - 'मामा चितळ्यांची मुलगी' , निव्वळ एवढ्या ओळखीवर, आसरा घ्यायला आला होता जरा वेळ ....
सांगता सांगता आई रडायला लागली ,"मती गुंग झाल्यासारखी वागले मी - त्या भल्या माणसाला फक्त चहा दिला. "जातो'" म्हंटल्यावर, बरं म्हणाले आणि रात्रीचं सगळं पूर्ण करण्याच्या विवंचनेत स्वयंपाकघरात आले -आणि बहुधा अन्नपूर्णेनीच जागं केलं मला ! कपाळावर हात मारला आणि वैशूला पाठवलं त्यांना परत घेऊन यायला - त्यांना जेवणाचं विचारायला कशी चुकले मी - बुद्धी कुठे गहाण पडली माझी ! ते वर आल्यावर त्यांची माफी मागून त्यांना पानावर बसवलं . दोन दिवस अन्न पोटात नसणाऱ्या माणसाची लाचारी काही वेगळीच असते - कुठला स्वाभिमानी माणूस असा परत येऊन पानावर बसला असता .... पण ते बसले आणि रात्री साठी केलेला सगळा स्वयंपाक वाढला मी त्यांना - कमी पडलं आपल्याला तर पडू दे, पण हा माणूस पोटभर जेवल्या शिवाय उठता कामा नये ... आणि ते जेवलेही पोटभर - प्रत्येक घासानिशी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि प्रत्येक श्वासानिशी जणू आपल्या साठी आशीर्वाद ! त्यांचं पोट शांत झालं ,इकडे सूर्याची अग्नी थंडावली. रात्रीचा डबा घेऊन ते परत कलकत्याला जायला निघाले - बोलले नाही काही पण माझा ठाम विश्वास आहे - आयुष्यात कदाचित खूप गोष्टी कमी पडल्या असतील आपल्याला - त्या कुटुंबाची आणि आपली फार काही वेगळी परिस्थिती नव्हती - पण दोन वेळची पोळी कधी चुकली नाही आपली - पुढचा स्वयंपाक काय करू हा जीव घेणा प्रश्न त्यांच्या आशीर्वादानं कधीच पडला नाही मला - माझ्या घरातली अन्नपूर्णा कायम हसत राहिली आणि माझ्या धान्याची कोठी कायम भरत राहिली ! "
अगं आई , तुझीच काय , माझीही कोठी कधी रिकामी होऊ दिली नाही तिनं - म्हणूनच बहुतेक प्रत्येक वेळी सामान भरताना ही गोष्ट आठवते मला आणि आठवते गौरीहार पुजताना ताईनी सांगितलेली प्रार्थना :
"गौरी गौरी सौभाग्य दे
घरच्या सगळ्यांना आरोग्य दे
संसारात माझ्या आनंद दे; अन्
दारी येईल त्याला पूर्णान्न दे ! "
घरच्या सगळ्यांना आरोग्य दे
संसारात माझ्या आनंद दे; अन्
दारी येईल त्याला पूर्णान्न दे ! "
त्याच गौरी कडे ,त्याच श्रद्धेने आज पुन्हा मागते
"गौरी गौरी सौभाग्य दे
Cook A Curry ला आशीर्वाद दे !"
Cook A Curry ला आशीर्वाद दे !"